Country Which Refund Full Toll Amount To Drivers: राज ठाकरेंनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुककोंडीनंतर टोलचे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे. मात्र असं काही होण्याची शक्यता कमी असली तरी एका देशात अशापद्धतीने पैसे परत केले जातात.
चालकांना टोलची पूर्ण रक्कम परत करणारा देश मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांची कोंडी फुटली असून गुरुवारी मध्यरात्रीनंतर या मार्गावर वाहतूक सुरु झाली आहे. मंगळवारी सायंकाळी एका गॅस टँकरचा अपघात झाल्याने महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला हा मार्ग 32 तासांनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या मार्गावर 62 किलोमीटरहून अधिक दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं भयानक चित्र पाहायला मिळालं. मात्र या गोंधळावर संताप व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणात सरकारने टोलचे पैसे परत द्यावेत अशी मागणी केली आहे. केवळ रस्ते बांधणे आणि टोल घेणं हे सरकारचं काम नसल्याचं राज यांनी म्हटलं आहे. खरं तर अशापद्धतीने टोल परत दिला जाणाऱ्या भारतात तरी शक्यता शून्यच आहे. मात्र जगात खरोखरच असा एक देश आहे जो ट्रॅफिक झालं तर चालकांना टोलचे पैसे परत करतो. हा देश कोणता? या देशातील हे धोरण काय आहे याबद्दलच जाणून घेऊयात...
कोणत्या देशात आहे ही योजना?
ट्रॅफिक जॅम लागल्यास त्यामध्ये अडकलेल्या चालकांना नुकसानभरपाई देणाऱ्या देशाचं नाव आहे इटली! ड्रायव्हर्सला कम्पसेशन देण्याची ही योजना इटलीमध्ये राबवणार जाणार आहे. या योजनेचा सर्व मसुदा तयार करण्यात आला आहे. ही योजना लवकरच लागू होणार आहे. इटलीमध्ये हायवेला ऑटोबान असं म्हणतात. याच ऑटोबानवर ट्रॅफिक जॅम किंवा मोठ्या प्रमाणात वाहनं अडकून पडल्याने प्रवासाला विलंब झाल्यास, अडकून पडलेल्या वाहनचालकांना टोलच्या रक्कमेमधील काही भाग किंवा पूर्ण रक्कम परत दिली जाणार आहे.
ही योजना डिसेंबर 2025 मध्ये जाहीर झाली आणि लवकरच यावर अंमलबजावणी होणार असल्याचं इटलीमधील प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार 2026 च्या मध्यापर्यंत हा नियम लागू होणार आहे.
नियम काय सांगतो? कोणाला किती पैसे मिळणार?
टोलचे पैसे परत करण्यासाठी तीन निकष ठरवण्यात आले आहेत. हे निकष खालीलप्रमाणे:
30 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जॅम असल्यास: विलंब कितीही असला तरी रिफंड मिळेल.
30 ते 50 किलोमीटर: विलंबाच्या प्रमाणात रिफंड.
50 किलोमीटरपेक्षा जास्त ट्रॅफिक जॅम असेल तर जवळपास सर्व म्हणजेच 100 टक्के रक्कम परत केली जाईल.
हे ऑटोस्ट्रेड पर इटालिया (Autostrade per l'Italia) या इटलीच्या मुख्य हायवे ऑपरेटरद्वारे राबवले जाणार आहेत. हीच कंपनी संपूर्ण इटलीमध्ये टोल गोळा करण्याच काम करते. ड्रायव्हर्सना कमी त्रास व्हावा आणि हायवे व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने हे बदल केले जाणार आहेत.
सध्या इटली हा एकमेव देश आहे जिथे ट्रॅफिक जॅमसाठी थेट ड्रायव्हर्सना पैसे परत देण्याची योजना आहे. या योजनेबद्दल जाणून घेतल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 62 किलोमीटरच्या ट्रॅफिक जॅमसंदर्भात राज ठाकरेंची मागणी योग्य आहे असं वाटणं चुकीचं ठरणार नाही.


